लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे. प्रचाराचा ज्वर शिगेला पोहचला आहे. अशातच औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवारांनी चांगलीच रंगात आणली होती. शिवसेनेतून बाहेर पडलेले हर्षवर्धन जाधव यांनी नवीन पक्ष स्थापन करून लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यातने आ. अब्दुल सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. मात्र, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सत्तारांचे बंड थंड झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये जाण्याची होती चर्चा
आपल्याला विश्वासात न घेता उमेदवारी दिल्याचे सांगत आ.सत्तार यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. यांनतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्च्या जोर धरू लागल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली होती त्यामुळे सत्तार भाजपात जाणार असल्याचे तर्क लढवले जात होते. मात्र, आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आ. अब्दुल सत्तार यांनी सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला आहे. मात्र , काँग्रेस पक्षावरील त्याची नाराजी अजूनही संपलेली नाही. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांची नाराजी दूर करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.